बहुप्रतिक्षित महावितरण भरती परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्र जाहीर

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मार्फत घेण्यात येणाऱ्या विद्युत सहाय्यक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या अधिकृतपणे तारखा आणि प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही दिलासाजनक बातमी आहे. प्रसिद्ध झालेल्या ताज्या अधिसूचनेनुसार, विद्युत सहाय्यक पदांसाठी २० मे ते २२ मे २०२५ रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत विविध श्रेणीतील मोठ्या संख्येने रिक्त पदे भरले जाणार आहेत. एकूण ५ हजार ३४७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये एससी, एसटी, व्हीजे-ए, एनटी-बी, एनटी-सी, एनटी-डी, ओबीसी, एसबीसी, ईडब्ल्यूएस आणि खुल्या श्रेणींसाठी आरक्षण समाविष्ट आहे. महिला, माजी सैनिक, अपंग व्यक्ती आणि कुष्ठरोग बरे झालेल्या व्यक्ती, बुटकेपणा आणि अॅसिड हल्ल्यातील पीडितांसारख्या विशेष गरजा असलेल्या उमेदवारांसाठी देखील जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही भरती सर्व समावेशक होणार असल्याचे म्हटले जात आहे.
महवितरण परीक्षेचे प्रवेशपत्र काढण्यासाठी, तुम्हाला महावितरणच्या (MSEDCL) अधिकृत वेबसाइटला (mahadiscom.in) भेट देऊन, तुमचा नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला प्रवेशपत्राची (ऍडमिट कार्ड) लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढून घेवू शकता.



