दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट,पाचांबे संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न ; सभेत गावातील विकास कामांवर चर्चा

संगमेश्वर – तालुक्यातील दत्तगुरु सेवा मंडळ ट्रस्ट, पाचांबे या संस्थेची सर्वसाधारण सभा दि.१३ एप्रिल २०२५ रोजी शिक्षक भवन हॅाल नवी पेठ, पुणे या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली. सदर बैठकीसाठी उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, संतोष कोळापटे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत ही मिटींग पार पडली.
दत्तगुरु सेवा मंडळाच्या वतीने देवरुख आगाराला संगमेश्वर – पाचांबे – नेरदवाडी मार्गावर धावणाऱ्या बसेससाठी नामफलक लावण्याची मागणी केली आहे त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली तर रस्त्यावरील दिशादर्शक फलक लावण्यासंदर्भात ही मागणी केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मंडळाच्या वतीने गाव पातळीवर राबवण्यात येणाऱ्या विकासकामांचा आलेख तयार करणे, श्री.दत्त मंदिर जीर्णोद्धार सोहळा व त्याची कार्यक्रम रूपरेषा, श्री.दत्त गुरु सेवा मंदीर ट्रस्ट च्या कामकाजात सुधारणा व ग्रामपंचायतीच्या कामाचा सहा महिन्यांनी आढावा घेणे, ट्रस्ट ऑफिसविषयी आवश्यक निर्णय, डिसेंबर २०२५ रोजी दत्तजयंतीच्या मुहूर्तावर श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार सोहळा आयोजित करणे, वार्षिक अहवाल व हिशोब तपासणी आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन येणाऱ्या काळातील कामांची दिशा ठरविण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रस्ट सदैव कटिबद्ध असून, येत्या काळात ठोस उपक्रम राबवले जाणार असल्याचे ट्रस्ट पदाधिका-यांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस ट्रस्टचे पदाधिकारी उपाध्यक्ष दिपक बोडेकर, उपाध्यक्ष सिद्देश भुरावणे, उपाध्यक्ष बबन शिंदे, सचिव प्रशांत भुरावणे, सचिव दिपक घडशी, उत्सव प्रमुख सतीश बोडेकर, संपर्क प्रमुख महेश सावंत, अनंत द. सावंत, निकेतन भुरावणे,सतीश बोडेकर आणि ट्रस्टचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



