अंमली पदार्थ विरोधी व्यापक जनजागृती मोहीम राबवा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
सर्व मोकळ्या जागा, इमारतींचे सर्वेक्षण करा, जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या (NCORD) बैठकीत केल्या सूचना

कोल्हापूर – अंमली पदार्थ विरोधी व्यापक जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे. अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत नसल्याची खात्री करून कोणत्याही रासायनिक कारखान्यांमध्ये किंवा बंद इमारतींमध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असणाऱ्या कारखान्यांमध्येही अशा पदार्थांचे उत्पादन होत नसल्याची तपासणी वेळोवेळी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात करण्यात आले होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांच्यासह पोलिस, जिल्हा महिला बाल विकास कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, भारतीय डाक विभाग, जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी कार्यालयातील समिती सदस्य उपस्थित होते.
शाळा, महाविद्यालये, बगीचा, सिनेमागृह, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, पर्यटन स्थळे, हॉटेल, लॉजिंग, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होवू शकते, अशा परिसरावर विशेष लक्ष देवून अवैध कृती आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी या बैठकीत दिले. अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती (NCORD) गठित करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत टपाल विभागाने पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुन व त्या पार्सलमध्ये काय आहे याची तपासणी करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल सुपूर्द करावे. बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करावे. तसेच कंपनीत कोणत्या पदार्थाचे उत्पादन होते व त्यात काही इतर रसायने मिसळून अंमली पदार्थ तयार होतात का, याची खातरजमा करावी. तसा अहवाल प्रशासनाला सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
समिती सदस्य म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तसेच नगर प्रशासन अधिकारी यांना घेवून ग्रामपंचायत स्तरावर व शहरी भागात मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. येणाऱ्या ग्रामसभेमध्ये अंमली पदार्थ सेवना विरोधी शपथ घेण्याबाबत सूचना केल्या. प्रत्येक राज्य सीमेवर याबाबत अधिक क्षमतेने तपासणी करून कार्यवाही करा, नेहमी येणाऱ्या तक्रारींच्या ठिकाणी पोलीस विभागाने गस्त वाढवावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.
अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम जनजागृती अभियानबाबत पोलीस, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो, शिक्षण विभाग व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.
युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयस्तरावर व्यापक मोहिम राबवा
जिल्ह्यातील अशा ठिकाणांची, शाळांची माहिती घ्या की त्या ठिकाणी अंमली पदार्थ सेवन अथवा विक्रीच्या घटना घडलेल्या आहेत. त्याठिकाणी विशेष योजना आखून अंतर्गत तपशील शोधून त्यावर आळा घाला. तसेच प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यापक मोहिम राबवून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी शिक्षण विभागाला दिल्या. शाळा व महाविद्यालयांमधील मोकळ्या जागांवर रात्री गस्त वाढवा. त्याठिकाणचे सीसीटीव्ही कार्यरत आहेत का पहा. अशा ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागासह संबंधित शाळांनी कार्यवाही करावी. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देवून युवकांमध्ये प्रबोधन करून ही मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शिक्षक-पालक संवाद सत्र वेळोवेळी आयोजित करून पालकांकडून याबाबत अधिक माहिती घ्या. या संवादातून विद्यार्थ्यांबद्दल अधिक माहिती एकत्रित होईल व त्यानंतर जर काही चुकीचे आढळून येत असेल तर त्या भागात पोलीस विभागाने त्या बाबींवर आळा घालावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.



