निवडणुकीच्या अनुषंगाने नमुंमपा मुख्यालयात प्रसारमाध्यमे निरीक्षण कक्ष व माध्यम कक्ष कार्यान्वित ; आयुक्त डॅा. कैलास शिंदे यांनी केली कक्षाची पाहणी

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली असून मा.राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक विषयक प्रत्येक बाबीचे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक नियोजन करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे यांची मिडीया सेल आणि माध्यम प्रमाणन व संनियंत्रण कामकाजाचे समन्वय अधिकारी (नोडल ऑफीसर) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समितीचे गठन करण्यात आलेले आहे.
निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिका मुख्यालयात तिस-या मजल्यावर ‘प्रसारमाध्यम निरीक्षण कक्ष (Media Monotoring Center)’ स्थापित करण्यात आलेला असून त्याठिकाणी दैनंदिन वृत्तपत्रे, नियतकालिके, टिव्हीवरील वृत्तचित्रवाहिन्या, यू ट्युब वाहिन्या आणि समाजमाध्यमांचे संपूर्ण निवडणूक कालावधीत निरीक्षण केले जाणार आहे. याकरीता कामाच्या स्वरूपानुसार अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून वेगवेगळ्या प्रसार माध्यमाची जबाबदारी स्वतंत्र कर्मचारी समुह निर्माण करून त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तळमजल्यावरील पत्रकार कक्षात ‘माध्यम कक्ष (Media Center) स्थापित करण्यात आलेला आहे.
नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्रसारमाध्यम नियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी करताना माध्यमांचे निरीक्षण करणा-या अधिकारी, कर्मचारी समुहाने करावयाच्या अपेक्षित कामाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ.अमोल पालवे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवार यांचेकडून प्रसारित / प्रसिध्द करावयाच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे, प्रसारमाध्यमांना निवडणूक विषयक कामकाजाची माहिती देणे, प्रसारमाध्यमांमार्फत वृत्तसंकेतांचे पालन होत असल्याबाबत निरीक्षण करणे, पेड न्यूज संदर्भातील तक्रारी / प्रकरणांची चौकशी व निराकरण करणे, समाजमाध्यमांसंदर्भात देखरेख करणे याविषयी राज्य निवडणूक आयोगाने दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती कामकाज करणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) श्रीम.रश्मी नांदेडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी श्री. सत्यवान उबाळे हे समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
निवडणूकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षास अथवा उमेदवारास दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्युब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खाजगी एफ.एम.वाहिन्या, सिनेमागृह, सार्वजनिक ठिकाणचे ऑडिओ – व्हिज्युअल डिस्प्ले, ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे अशा कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे जाहीरात प्रसारित / प्रसिध्द करावयाची असल्यास त्या प्रस्तावित जाहिरातींचे समितीकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. पूर्वप्रमाणन केले नसल्यास त्या जाहिरातीचे प्रसारण / प्रसिध्दी करता येणार नाही याची विशेष नोंद घ्यावयाची आहे.
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 15 डिसेंबर पासून आचारसंहिता जारी झाली असून आचारसंहिता कालावधीत सर्वच घटकांनी आदर्श आचारसंहिता नियमावलीचे पालन करावे व प्रसारमाध्यमांनीही सर्वांना समान न्याय या तत्वावर आचारसंहितेस अनुसरून वस्तुनिष्ठ वृत्ते प्रसिध्द करावीत तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.



