आपला जिल्हाक्राईम

चिपळुणात अवैध सावकारी करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

चिपळूण – अवैध सावकारीच्या विरोधात दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिपळूण मधील एका महिलेने पोलीस आणि सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्याकडे सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. शहरात खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. अडचणीत सापडलेल्यांना अवैध सावकार दरमहा पाच ते ५० टक्के दराने कर्ज देतात आणि नंतर पठाणी पद्धतीने व्याजवसुली करून कर्जदारांची आर्थिक पिळवणूक करतात. व्याजाचे पैसे देण्यास उशीर झाल्यास कुटुंबीयांनाही नाहक त्रास दिला जात होता. यामधून शहरात काही गुन्हे घडले. घेतलेले कर्ज आणि व्याज परत करताना कर्जदाराला तारेवरची कसरत करावी लागत होती. नोकरी आणि उद्योगधंद्यातून मिळालेली रक्कम सावकारांच्या खिशात जात होती. जिल्ह्यात असे प्रकार घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अवैध सावकारीच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एका तक्रारदाराने सौ. परवीन सोहेब मुलानी (रा. अलोरे मुस्लीम मोहल्ला, ता. चिपळूण) तसेच इकबाल गनी खेरटकर (रा खेर्डी, विकासवाडी, ता. चिपळूण) यांच्या विरुध्द पोलीस तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था चिपळूण या कार्यालयाकडे अवैध सावकारी बाबतचा तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांची चौकशी करण्यासाठी एक पथक नेमले. या पथकाने दोघांच्या घराची झडाझडती घेतल्यानंतर तेथे तक्रार अर्जात नमुद मुदयांप्रमाणे काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली असून त्यानुसार दोघा संशयीतांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button