चिपळूणमध्ये दहावीच्या विद्यार्थीनीवर अतिप्रसंग अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

चिपळूण – चिपळूण मधील सावर्डे पोलीस स्थानकाच्या हद्दीत दहावीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा गंभीर प्रकार नुकताच घडला. संबंधित तरुणाने मित्राच्या घरी नेऊन हा प्रकार केला. या प्रसंगामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली. तिला तिथेच टाकून आरोपी पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ शोधून बेड्या ठोकल्या आहेत.
सावर्डेचे पोलीस निरीक्षक जयवंत गायकवाडी यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, दहावीत शिकणाऱ्या एका मुलीचा मोबाईल नंबर आरवली परिसरात राहणाऱ्या मात्र सध्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या तरुणाने मिळवला आणि त्या आधारे तिला तो कायम संपर्क करीत होता. ती मुलगी त्याचा फोन टाळत असे. मात्र तरीही सतत फोन करीत होता. अखेर नाईलाजाने त्याचा फोन तिने स्वीकारला. तो सातत्याने तिला तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत असे. मात्र ती मुलगी त्याला दाद देत नव्हती. त्यानंतर तो मुंबईतून गावी आला.
मुंबईहून तो १३ डिसेंबरला सावर्डे परिसरात दाखल झाला. त्याने त्या मुलीला कॉल केला. ‘मला फक्त तुला एकदा भेटायचे आहे, मी मुंबईहून तुझ्याजवळ बोलायचे म्हणून आलो आहे. मला फक्त एकदाच भेट दे’ अशी गयावया करू लागला होता. तिच्या घराजवळ जावून तिला त्याने बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने गाडीवर बसवून आपल्या मित्राच्या घरी आणले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या अतिप्रसंगाने ती मुलगी जागीच बेशुद्ध पडली. तेव्हा तिला तिथेच टाकून त्या तरुणाने पलायन केले. दीड दोन तासानंतर ती शुद्धीवर आंल्यानंतर घरात पोहचली. पूर्णतः भयभीत झालेल्या आपल्या लेकीला बघून वडील आणि नातेवाईक हादरून गेले. तिने आपल्यावर ओढवलेला प्रसंग वडिलांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिचे नातेवाईक तिला घेवून सावर्डे पोलीस स्थानकात दाखल झाले. एका अल्पवयीन मुलीवर ओढवलेल्या आपत्तींची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयवंत गायकवाड यांनी तात्काळ सूत्र हलविली. आपल्या कर्मचाऱ्यासह स्वतः त्या तरुणांचा सर्वत्र शोध घेतला. रेल्वे स्टेशन, बस स्थानक परिसरात पोलीस तैनात केले. अखेर तो तरुण पोलिसांच्या सापळ्यात सापडला. तात्काळ त्याला अटक करून पोलीस स्थानकात आणले.
संबंधित तरुणाच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यानुसार त्याच्या विरोधात भादवी कलम ३७६, बाल लैगिंग शोषण (पोस्को) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.



