आपला जिल्हा

राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव व भाजपा महिला मोर्चा यांच्यावतीने महिलांना प्रशिक्षण.

हस्तनिर्मित गृहोपयोगी व सजावटीच्या उत्पादनांचे कोंडगे, ता. लांजा येथे मार्गदर्शन ; युवा भाजपा कार्यकर्त्या कु. अचला विश्वासराव यांचे योगदान उल्लेखनीय.

लांजा – आर्थिक समृद्धी हा महिला सशक्तीकरणाचा गाभा आहे हे ओळखून भाजपा नेत्या सौ. उल्काताई विश्वासराव यांच्या प्रयत्नांतून, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. परिणिता सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने कोंडगे, ता. लांजा येथे दोन दिवसीय हस्तनिर्मित गृहोपयोगी व सजावटीच्या उत्पादनांचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. २० महिलांनी दोन दिवस तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत कलाकुसरीच्या विविध वस्तूंचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले.

या शिबिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सौ. उल्का विश्वासराव म्हणाल्या, “मा. पंतप्रधान यांच्या स्वप्नातील विश्वगुरु भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी भारतातील तमाम माताभगिनींनी स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. दैनंदिन कामकाजातून वेळ काढून कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केल्यास हळूहळू त्याच्या विक्रीची व्यवस्था करता येईल. यासाठी झर्ये गावच्या युवा महिला उपसरपंच कु. अचला विश्वासराव पुढाकार घेऊन विक्रीची व्यवस्था करतील. प्रशिक्षण घेऊन त्याचा उपयोग अर्थप्राप्तीसाठी केल्यास आणि त्यातून बचत करायला शिकल्यास कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होईल. हेच धोरण मा. पंतप्रधान राबवत असल्याने अनेकींनी स्वतःला सिद्ध केले आहे. आता लांज्यातील महिलांनी मागे राहून चालणार नाही.

या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून जोगेश्वरी मुंबईच्या प्रथितयश लघुउद्योजिका सौ. दिव्यांका पेंडकलकर व त्यांच्या सहकारी सौ. दीपाली चव्हाण उपस्थित होत्या. लांजा तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाताताई साळवी, जिल्हा उपाध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई जठार , शिवाजी पराडकर, कमलाकर शिवगण , शिवानी सावंत , काजोल जठार तसेच सौ स्मितल जाधव, ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहून सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन दिले. दोन दिवसांच्या या कार्यक्रमाचे सनियंत्रण कु. अचला विश्वासराव यांनी तर व्यवस्थापनाची जबाबदारी लांजा तालुकाध्यक्षा सौ. परिणिता सावंत, सौ. रसिका सावंत, सौ. दीक्षा खामकर, सौ. साक्षी पराडकर, सौ. रिमा सुर्वे, श्री. अविनाश कदम, श्री. मंगेश बारस्कर तसेच भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पार पाडली. कार्यक्रमानंतर प्रशिक्षणार्थींनीही आयोजकांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button