
चिपळूण – चिपळूण तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग असलेल्या बामणोली – चिवेली – गोंधळे हा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून या रस्त्यावर वाहने चालवणे कठीण झाले आहे.या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणासाठी 50 लाखाचा निधी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.याबाबत चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के यांनी सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता.
खाडी पट्ट्यातील अत्यंत महत्वाचा असलेल्या या दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गांवर एस. टी. बस धावत नाही. याचा फटका येथील अनेक विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तसेच नाहक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
मात्र आता आमदार भास्कर जाधव यांनी या रस्त्याला निधी मंजूर केला असल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
अत्यंत आवश्यक अशा या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांचे चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे प्रमुख कार्यवाह पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.
सदर रस्त्याचे काम संबंधित विभागाने त्वरित पूर्ण करावे, अशी मागणीही रमेश शिर्के यांनी केली आहे.



