देवरूखमधील पत्रकार सुरेश सप्रे यांना मातृशोक; श्रीमती सुमती सप्रे यांचे वृद्धापकाळाने निधन

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील जेष्ठ पत्रकार श्री. सुरेश वामन सप्रे यांच्या मातोश्री श्रीमती सुमती सप्रे यांचे आज रविवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास देवरूख येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.
सुमती सप्रे या अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. एखाद्याला मदत करणे हा त्यांचा विशेष स्वभावगुण होता. त्या गेले काही दिवस आजारी होत्या. अनेकवेळा अत्यंत गंभीर स्थितीतून त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर साक्षात मृत्युला परत पाठवले. मात्र आज रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या मुळच्या कोंढ्रण गावच्या होत्या. ‘ताई’ या टोपण नावाने त्या सर्वत्र सुपरिचित होत्या.
अत्यंत प्रेमळ व सुस्वभावी असणा-या ताई या कोंढ्रण गावात आणि देवरुखात लोकप्रिय होत्या. त्यांच्या रुपाने जुन्या-नव्या पिढीला एकत्र जोडणारा एक दुवा निखळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात ५ मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.



