सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर करणार संगमेश्वर – पाटण घाटमार्गाची प्रत्यक्ष पाहणी

संगमेश्वर – मुंबई – गोवा महामार्गापासून सुरु होणा-या आणि प्रस्तावित असलेल्या संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च या कंपनीकडे देण्यात आले आहे. या कामाचे PowerPoint Presentation, सादरीकरण रत्नागिरी अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आले आहे. पुढील सादरीकरण सचिव ( रस्ते ) यांच्या स्तरावर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर यांनी सचिव ( रस्ते ) यांना केल्या आहेत हा घाटमार्ग कसा असेल याबाबत सादरीकरणात माहिती उपलब्ध आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर या प्रत्यक्ष त्या जागी जावून या घाटमार्गाची पाहणी करणार असल्याच्या वृत्ताला श्रीमती पाटणकर – म्हैसकर यांनी दुजोरा दिला आहे मात्र पाहणी दौ-याच्या तारखेबाबत अद्याप निश्चिती नसल्याचे सांगण्यात आले.
संगमेश्वर ते पाटण या ४६ कि.मी मधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेयर्स ॲन्ड इंजिनीअरींग कंसल्टंट लि. ( Monarch Surveyors And Engineering Consultants LTD ) या कंपनीला देण्यात आले आहे. घाटमार्ग कामाचा डीपीआर शासनाला सादर करण्याची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे. विहीत मुदतीत या कंपनीने डीपीआर शासनाला सादर करुन प्रशासकीय मान्यता प्रक्रीया पार पाडत जलदगतीने कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी रत्नागिरी व सातारा या दोन्ही जिल्ह्यातील जनतेची आहे.
संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. २०.१०० कि.मी एकेरी रस्ता पुर्ण केल्यास या मार्गावरील वाहतूक सुरु होणार आहे.



