ए. के. शिंदे यांना शासनाचा आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार

चिपळूण – तालुक्यातील पोफळी येथील ग्रामविकास अधिकारी ए.के. शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री. शिंदे यांनी गेल्या ३९ वर्षाच्या सेवेत समाजाभिमूख कामाला प्राधान्य दिले. प्रभावीपणे विविध शासकीय योजना राबवल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजात झोकून देत काम केले. त्यांच्या या कामकाजाची दखल घेत शासनाने आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कारासाठी निवड केली आहे.
लढाऊ बाणा असलेले ए.के. शिंदे हे १९८४ मध्ये खेड तालुक्यात ग्रामसेवक म्हणून रूजू झाले. त्यावेळी ग्रामिण दुर्गण भागात कठीण परिस्थिती होती. खेड तालुक्यातील दुर्गम भागातील विविध अडचणीवर मात करीत शासकीय योजना ग्रामस्थांपर्यत पोहोचवल्या. त्यानंतर त्यांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील विविध ग्रामपंचायतीतही काम केले. २०१२ मध्ये त्यांना ग्रामविकास अधिकारी म्हणून बढती मिळाली. त्यानुसार ते पोफळी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून रुजू झाले. पोफळी ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळतानाच त्यांनी खेर्डी ग्रामपंचायत ६ वर्षे यशस्वीरित्या सांभाळली. कोरोना कालावधीत त्यांनी ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. श्री. शिंदे हे गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने त्यांनी तालुका तसेच जिल्हास्तरावर पाठपुरावा करून योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांच्या वैविध्यपुर्ण कामकाजाची दखल घेत राज्य सरकारने आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड केली आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.



