ताज्या घडामोडी

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) पर्यंत भागाची केली पाहणी

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) पर्यंत संपूर्ण मरीन ड्राइव्हची पायी फिरून पाहणी केली.

मुंबईसाठी नैसर्गिक देणगी असलेल्या मरीन ड्राइव्हचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी स्वच्छतेत सातत्य ठेवावे, झाडांची निगा राखावी, आसन व्यवस्था म्हणून तयार केलेले बाकडे सुस्थितीत ठेवावेत, दुभाजकांमध्ये कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी, अनावश्यक असलेले फलक कमी करावेत, आदी सूचना श्री. गगराणी यांनी पाहणीवेळी केल्या. दिव्यांच्या खांबांची रंगरंगोटी करून या परिसराचे सौंदर्य अधिक खुलवता येईल, असेही त्यांनी सांगितले.

संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसर रोज स्वच्छ ठेवावा, रस्त्यालगत अस्ताव्यस्त आढळणारे बॅरिकेड्स व्यवस्थित राखावेत, स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) परिसरातील छोटी चौपाटी येथील बांधकाम साहित्य काढून तेथे स्वच्छता राखावी, असे निर्देश श्री. गगराणी यांनी दिले.

महानगरपालिकेच्या उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, पोलिस उप आयुक्त श्री. प्रशांत परदेशी, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, महानगरपालिकेचे संबंधित सहायक आयुक्त, अधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button