गर्डर लाँचिंगच्या कामात विशेष खबरदारी घेण्याची मागणी ; चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील फ्लायओव्हरवर क्रेनच्या साह्याने गर्डर लाँचिंगचे काम करताना समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यादृष्टीने विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने आज प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले. त्यांच्यावतीने वरिष्ठ लिपिक प्रकाश सावंत यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदन म्हटले आहे, की मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणमधील बहादूरशेखनाका ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. या कामासाठी विशेषतः गर्डर लाँचिंगचे काम करण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. ही क्रेन चिपळुणात दाखल झाली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यात महामार्गाच्या पुलाच्या कामात गर्डर आणि क्रेन कोसळून सुमारे 20 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. आहे. गर्डर लाँचिंग करताना तांत्रिक कारणामुळे अचानक कोसळून ही दुर्घटना घडली होती.
चिपळूण शहर हे गजबजलेले शहर आहे. मुंबई-गोवा महामार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परिसरातील शाळांमुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसही रस्त्यावरून धावत असतात. तसेच काम सुरू असलेल्या फ्लायओव्हर नजीकच्या परिसरात अनेक छोटी-मोठी दुकाने व टपऱ्या आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावर घडलेली दुर्घटना लक्षात घेता, चिपळूणमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. तशी सूचना आपण सदरचे काम करणाऱ्या कंपनीला द्यावी. हे काम सुरू असताना केवळ कामगारांवर अवलंबून न राहता संबंधित कंपन्यांचे जबाबदार अधिकारी उपस्थित राहतील. तसेच काम बंद असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स आणि योग्य ती खबरदारी व आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीने आपण आपल्या स्तरावरून संबंधितांना योग्य ती सूचना द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.
चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक जाधव, काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, प्रदेश प्रवक्ते यश पिसे, प्रशांत यादव यांचे स्वीय सहायक गुलजार गोलंदाज यांनी हे निवेदन दिले.



