राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जलजीवन मिशन कामाची पाणी पुरवठा अधिकारी करणार पाहणी ; पाईपलाईन वाढीव लांबीसाठी आमदार शेखर निकम प्रयत्नशील

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राजिवली, रातांबी, कुटगिरी या तीन गावांसाठी तीन स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजुर केल्या आहेत या तीन ही गावातील नळपाणी योजनेत अनियमितता असल्याची तक्रार कोकण आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती त्या पार्श्वभुमीवर आणि पाण्याचे स्त्रोत पाहण्यासाठी शनिवार दि.१६ मार्च २०२४ जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग रत्नागिरी कार्यकारी अभियंता, भुजल सर्व्हेक्षण विभागाचे अधिकारी आणि पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य तुकाराम येडगे,राजिवली सरपंच दिपीका सावंत व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत यावेळी पाणी पुरवठा अधिका-यांसमवेत संयुक्त पाहणी करुन राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कामे सुरु करण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कुटगिरी येडगेवाडीसाठी तब्बल १ कोटी ३७ लाख रुपये किंमतीची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे तर राजिवली साठी २.५० कोटी आणि रातांबी साठी ३५ लाखांचा निधी नळपाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत मात्र २०२४ उजाडले तरी येडगेवाडी आणि राजिवली च्या कामाला अद्याप गती येत नसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
येडगेवाडी नळपाणी योजनेसाठी राजिवली बौध्दवाडी या ठिकाणी मुळ जलस्त्रोत असलेल्या ठिकाणी विहीर करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. बौध्दवाडी या ठिकाणी विहीर केल्यास येडगेवाडी करांना मुबलक पाणी मिळणार आहे. या ठिकाणी विहीर केल्यास योजनेतील पाईपलाईन ची लांबी वाढत असल्याचे ठेकेदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे काम करण्यास अडचणी येत असून वाढीव लांबीसाठी अंदाजपत्रकात आवश्क बदल करण्यासाठी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम प्रयत्नशील असून त्यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.



