जलजीवन मिशन अनियमितता ; संतोष येडगे १५ ॲागस्ट स्वांतत्र्यदिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यासमोर विषप्राशन आंदोलन करणार.
देवरुख ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंत्यांकडून जि.प सीईओं चे आदेश पायदळी ; मनमानी करणा-या उप अभियंत्यामुळेच जिल्हा परीषद प्रशासन बदनाम

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना मंजूर झाली आहे. येथील योजनेच्या विहारीचे काम येडगेवाडी येथील तिवटी या ठिकाणी सुरु करण्यात आले मात्र या ठिकाणी येडगेवाडीला पुरेल इतके पाणी उपलब्ध नसल्याने या ठिकाणची विहीर रद्द करुन संपुर्ण येडगेवाडीला पुरेल इतक्या क्षनतेची विहीर करावी अशी मागणी करणा-या १५६ ग्रामस्थांनी आपल्या सह्यांचे निवेदन रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. या बाबत रत्नागिरी जिल्हा परीषद प्रशासनाने १५ ॲागस्ट स्वातंत्र्यदिनापुर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा १५ ॲागस्ट २०२४ रोजी आपण सहका-यांसमवेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषप्राशन आंदोलन करणार असल्याचे संतोष येडगे यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधीत विभागांना दिलेल्या निवेदनात तसे म्हटले आहे.
येडगेवाडीची सन २०११ च्या जनगणनेनुसार ५०९ लोकसंख्या आहे तर २०५३ ची संकल्पीत लोकसंख्या ही ९५९ होते येडगेवाडीला प्रतिदिनी ६३ हजार लिटर पाण्याची मागणी आहे. मात्र सध्या येडगेवाडी तिवटी या ठिकाणी विहीर खोदण्यात आली आहे त्या विहीरीत ३ एप्रिल २०२४ ला तत्कालीन उपअभियंता श्री.अनिनाश जाधव यांनी केलेल्या ( Yeild Test ) मध्ये प्रतिदिनी ३५०० लिटर पाणी येत अयल्याचे पत्र कनिष्ठ भूवैज्ञानिक, रत्नागिरी यांना पाठविलेले आहे. सदरचे पाणी येडगेवाडीसाठी पुरेसे नाही. येडगेवाडीची भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेवून राजिवली ग्रामपंचायत सरपंच यांनी दि.१३ मार्च २०२४ रोजी आणि चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांनी पाणी नसलेली तिवटी येथील विहीरीची जागा बदलण्याबाबत जिल्हा परीषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. येडगेवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनासोबत ही पत्रे जोडण्यात आली आहेत.
रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी स्वत: ५ एप्रिल २०२४ रोजी येडगेवाडी या ठिकाणी नळपाणी योजना कामाची पाहणी केली असता ग्रामीण पुरवठा उपअभियंता आर.एल लठाड यांना एप्रिल अखेरपर्यंत तिवटी येथील विहीरीची खोली आणि रुंदी वाढवल्यानंतर पाणी पातळी ( Yeild Test ) घेवून तसा अहवाल पाठवण्याचे आदेश दिलेले होते.
येडगेवाडी नळपाणी योजना विहीरीच्या जागेबाबत ९ जुलै २०२४ रोजी संगमेश्वर ( देवरुख ) गटविकास अधिकारी भरत चौगुले यांच्या आदेशानुसार राजिवली ग्रामपंचायत कार्यालयात जलजीवन मिशन च्या कामांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत बोलताना पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड यांनी येडगेवाडी नळपाणी योजनेसाठी खोदण्यात आलेल्या तिवटी येथील विहीरीत संपुर्ण येडगेवाडीला पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
ग्रामीण पाणी पुरवठा संगमेश्वर उप अभियंता आर.एल लठाड यांनी जिल्हा परीषद मुख कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. वरीष्ठांचे आदेश पाळत नसतील तर जनतेचे काय ऐकणार असा सवाल उपस्थित होत आहे. आर.एल लठाड यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी आणि पाणी नसलेल्या ठिकाणी चुकीच्या पध्दतीने खोदकाम केलेली तिवटीतील विहीर रद्द करुन मुबलक पाणी मिळेल अशा ठिकाणी नवीन विहीर तयार करुन त्या विहीरवरुन नळपाणी योजना करण्याची येडगेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे.



