अपघातआपला जिल्हा

संगमेश्वर तालुक्यतील कोंढण गावात दरड कोसळून घर जमिनदोस्त ; सात कुटुंबाना स्थलांतराच्या नोटीसा.

देवरुख - सागर मुळ्ये

देवरुख – दरड कोसळून एक घर जमीनदोस्त झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्ण या गावी गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घरात कोणीही राहत नसल्यामुळे जीवित हानी टळली. बाजूच्या सात कुटुंबांना देखील स्थलांतराच्या नोटीसा तहसीलदार अमृता साबळे यांनी भेट देऊन बजावल्या आहेत.

या घटनेमध्ये कोंढ्ण गावातील डांबरी रस्ता देखील खचला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोंढ्ण येथील विनीत रामचंद्र शिंदे वय वर्ष ४५ यांचे इंदिरा आवास योजनेतील हे घर पूर्णपणे दरडी खाली गेले आहे.

शिंदे यांनी हे घर नुकतेच बांधून पूर्ण केले होते. मात्र त्या घरात राहत नसल्यामुळे ते व त्यांचे कुटुंब या घटनेत वाचले आहे. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरड कोसळल्याचे घटना समजतात तहसीलदार अमृता साबळे, मंडळ अधिकारी डि.के. फुलोरे, तलाठी एम एल जादगार, देवरुख पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, माजी आमदार सुभाष बने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

शिंदे यांचे घर जमीनदोस झाल्याची पाहणी केली. याचबरोबर डोंगराचा अजूनही भाग कोसळण्याची शक्यता प्रचंड पावसामुळे असल्याने तहसीलदार श्रीमती साबळे यांनी शिंदे यांच्या घराशेजारी असलेल्या सात कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस बजावल्या आहेत.

यातील दोन घरे ही बंद स्थितीत असून अन्य ५ कुटुंबांना घर खाली करून स्थलांतराची नोटीस दिली असल्याने ही पाच कुटुंबे आपल्या नातेवाईकांकडे अन्य गावी स्थलांतरित होत आहेत. या गावाकडे जाणारा डांबरी रस्ताच भुस्कलनामुळे खचून गेला आहे.

तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व शासकीय यंत्रणा या गावाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button