मटण-मच्छी विक्रेते नियोजित स्थळी स्थलांतरीत होण्यास राजी ; अन्यथा कारवाईचा बडगा उगारणार- प्रसाद शिंगटे

चिपळूण – शहरातील मटण व मच्छी मार्केट गेल्या १७ वर्षापासून बंद अवस्थेत असून ते सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील मटण व मच्छी विक्रेत्यांची बैठक घेत नियोजीत मटण व मच्छी मार्केट मधील गाळ्यांमध्ये स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले. या विक्रेत्यांच्या अडचणी मुख्याधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार मटण मच्छी व चिकन विक्रेते नियोजीत स्थळी स्थलांतरीत होण्यास राजी झाले. जे स्थलांतरीत होणार नाहीत, रस्त्याच्या कडेला बेकायदा हा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे स्पष्टपणे सांगितले.
शहरातील मटण, चिकन व मच्छी विक्रेत्यांची एकाच ठिकाणी सुविधा व्हावी. नागरिकांनीही एकाच छताखाली विविध मटण, चिकन व मच्छी खरेदी करता यावीत. यासाठी काही वर्षापुर्वी मटणव मच्छी मार्केटची उभारणी करण्यात आली. मात्र विविध कारणाने हे मार्केट सुरू झाले नाही. परिणामी शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेलाच या विक्रेत्यांनी ठाण मांडत व्यवसाय सुरू ठेवले. पालिकेकडून क्वचित कारवाई करण्यात आली. दरम्यान हा प्रक्लप पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. यासाठी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी शहरातील मटण, किचन व मच्छी विक्रेत्यांची बैठक घेत प्रशासनाची भुमिका स्पष्ट केली.
शहरात मटण व चिकन चे ३१ विक्रेते आहेत. तर मच्छी विकणारे ३० विक्रेते आहेत. तर मटण व मच्छी मार्केट मध्ये एकूण ४३ गाळे उपलब्ध आहेत. या गाळ्यांसाठी इच्छूकांची संख्या वाढल्यास लिलाव पद्धतीने ते दिले जाणार आहेत. मच्छी विक्रेत्यासाठी १३ गाळे आहेत. त्यामुळे उर्वरीत विक्रेत्यांची व्यवस्था काय, त्यांना कसे सामावून घेणार असा सवाल, मच्छी विक्रेत्यांनी केला.
त्यावर मुख्याधिकारी शिंगटे म्हणाले, पहिल्या टप्प्यात मोठ्या मच्छी विक्रेत्यांनी गाळ्यांचा ताबा घ्यावा. जे किरकोळ विक्रेते आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. शहरातील इतर आरक्षीत जागेत त्यांचे स्थलांतर करता येणार नाही. मटण व मच्छी मार्केट सुरू झाल्यानंतर शहरात इतर कुठेही रस्त्याच्या कडेला बेकायदा व्यवसाय करता येणार नाही. जे नियमबाह्य व्यवसाय करतील, त्यांच्यावर नियमीतपणे कारवाई केली जाईल. हे गाळे ३० वर्षाच्या कराराने विक्रेत्यांना दिले जाणार आहेत. भाडे देखील नाममात्र आहे. आजपर्यत जागेचा पर्याय नव्हता म्हणून पालिका प्रशासन विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारत नव्हते. आता मात्र खुलेआम व्यवसाय करता येणार नाही. १७ वर्षे पालिकेने सहकार्याचीच भुमिका घेतली, यापुढे ती घेतली जाणार नाही. मटण व मच्छी मार्केट मध्येच संबंधीतांना व्यवसाय करावेत, अशी सूचना केली. त्यानुसार मटण, मच्छी व चिकन विक्रेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला. सध्यातरी या विक्रेत्यांनी मटण व मच्छी मार्केट मध्ये गाळे घेण्यास आश्वासन दिल्याने १७ वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बैठकीला मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, प्रभारी प्रशासकीय अधिकारी राजू खातू, बापू साडविलकर, संदेश टोपरे, वैभव निवाते, राजेंद्र शिंदे, प्रणव खताल, अनिल राजेशिर्के यांच्यासह विक्रेते उपस्थित होते.



