आपला जिल्हा

नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचा दिवाळी सण आनंदात जावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सन 2024 – 25 या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना रू. 34,500/- तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रू. 28,500/- आणि आशा वर्कर यांना रु. 18,500/- रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.

यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना रू. 34,500/- इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना रू. 28,500/- इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.

याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे रू. 28,500/- इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू. 18,500/- इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

यासोबतच यावर्षी आरोग्य विभागातील कोविड, नॉन कोविड अंतर्गत कार्यरत अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील घड्याळी तासिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कर्मचारी आणि अंशकालीन निदेशक (कला, क्रीडा व कार्यानुभव) यांनाही रू. 18,500/- सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

अशाप्रकारे एकूण 4961 अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या अनुषंगाने दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आलेले असून त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षीपेक्षा रू. 1500/- इतक्या रक्कमेचे वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याच्या महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतलेल्या कर्मचारीहिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button