बेलासिस व शीव रेल्वे उड्डाणपूलांची कामे अनुक्रमे १५ डिसेंबर २०२५, ३१ मे २०२६ पर्यंत पुर्ण करा – मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई – महानगर क्षेत्रातील शीव (सायन) व बेलासिस (मुंबई सेंट्रल ) उड्डाणपुलांच्या कामांना वेग मिळत असून ही कामे गतीने आणि नियोजनबद्ध रितीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस आणि दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, रेल्वे प्रशासनासह समन्वय साधत सुयोग्य नियोजन करावे. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
शीव पूर्व-पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणी कामाचा श्री. बांगर यांनी बृहन्मुं बई महानगरपालिका मुख्यालयात आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी विविध निर्देश दिले. पोलीस सहआयुक्त (वाहतूक) श्री. अनिल कुंभारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
शीव पुलाच्या दक्षिणेकडील पादचारी पुलाचे काम रेल्वेमार्फत सुरू असून ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग पूर्णत्वास आला आहे. रेल्वेकडून रेल्वे हद्दीतील कामे दिनांक १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील, असेदेखील श्री. बांगर यांनी नमूद केले.
बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लोखंडी तुळया येणे, त्यांची जुळवाजुळव आणि स्थापित करणे आदी कामे दिनांक १० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पश्चिम दिशेच्या पोहोच मार्गातील राहिलेल्या एका खांबाचे काम सुरू करण्यात येईल. दिनांक १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिट टाकण्याच्या कामासह इतर सर्व कामे पूर्ण केली जातील, असे श्री. बांगर यांनी नमूद केले.



