आपला जिल्हा

चिपळुणातील गॅस पाईपलाईनचे काम रोखले, खोदाईमुळे रस्ते खराब होत असल्याचा आरोप

चिपळूण – शहरात खाजगी कंपनीकडून टाकण्यात येणाऱ्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या कामाविरोधात शिवसेनेसह भाजप व राष्ट्रवादी पक्ष कमालीचे आक्रमक झाले आहेत. या कामामुळे रस्त्यांची खोदाई केली जात आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र संबंधित कंपनीने नगर पालिकेकडे सुमारे ७६ लाखांचा निधी जमा करून देखील रस्त्यांच्या दुरूस्ती कामाची निविदा अद्याप जाहीर केलेली नाही. या खराब रस्त्याचा फटका नागरिकांना बसणार असल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी बुधवारी थेट रस्त्यावर उतरत काम रोखले. गॅस पाईपलाईच्या कामाला आमचा विरोध नाही. मात्र रस्ता दुरूस्ती कामाची जोपर्यंत निविदा जाहीर करून ठेकेदाराची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत काम सुरू करू नये, अशी तंबी देत तिथेच ठिय्या मांडला. दरम्यान, या आंदोलनाची तातडीने दखल घेत नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देतानाच ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काम बंदच ठेवण्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनाची माहिती मिळताच नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे व नगर अभियंता प्रणोल खटाव यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या वेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना पालिकेमार्फत रस्ता दुरूस्ती कामाचे अंदाजपत्रक तयार असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. तसेच कामाची निविदा आणि ठेकेदाराची नियुक्ती होत नाही तोपर्यंत काम बंदच ठेवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, संदेश किलजे, अर्चना कारेकर, सौ. किंजळकर, संतोष पवार, संजय रेडीज, पार्थ जागुष्टे, सानिका टाकळे, श्री. गुरव, भैया कदम, प्रतीक शिंदे, आकाश कदम, राहुल गुरव, आयुष कुबडे, जैफ शहा, ऋषिकेश हरवडे, निखिल रतावा, शीतल रानडे, निनाद आवटे, महेंद्र कांबळी, अजय भालेकर, श्री. डाफळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button